Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ३२

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ३२


दोघांचं प्रेम आता हळूहळू बहरू लागलं होतं…
एकमेकांच्या उपस्थितीतच समाधान मिळू लागलं होतं…
छोट्या छोट्या गोष्टी, साधे क्षण, आणि न सांगता..., न बोलता फक्त नजरेतून कळणारी भावनेची भाषा... या सगळ्यात ते दोघं आकंठ बुडत चालले होते...

कॉलेजचे दिवस मात्र वेगाने सरकत होते… लेक्चर्स कमी आणि आठवणी जास्त होते…

कॉरिडॉरमधली पावलं आता ओळखीची झाली होती..., व
कॅन्टीनचा कोपरा “आपला” वाटू लागला होता... आणि प्रत्येक दिवसाच्या शेवटी “उद्या पुन्हा भेटू” या वाक्यातच सगळी ऊर्जा दडलेली असायची...

पण म्हणतात ना... वेळ कुणासाठी थांबत नाही… त्याप्रमाणे
कॉलेज सुद्धा आता संपत आलं होतं…
आणि माधवचा हा लास्ट इअर असल्यामुळे त्याच्या आयुष्याला आता नवं वळण मिळणार होतं...

प्लेसमेंट्स, इंटरव्ह्यूज, भविष्यातली नोकरी,
घरच्यांच्या अपेक्षा... सगळं एकाच वेळी त्याच्या समोर उभं ठाकलं होतं...

गौरवी FY मध्ये होती… तिच्यासाठी कॉलेज शिक्षण अजून बरंच शिल्लक होतं...,

पण माधवसाठी हा शेवटचा अध्याय होता...  ज्याच्या शेवटी
“एकत्र” राहणं सोपं राहणार नव्हतं...

एका संध्याकाळी कॉलेजच्या गार्डनमध्ये दोघं शांत बसले होते...
आजूबाजूला निरोपाची हवा होती... हसणारी तोंडं, फोटो काढणारे ग्रुप्स..., आणि एकमेकांपासून दूर होणार हि कुठेतरी दडलेली हुरहूर होती…

गौरवीने हळूच विचारलं,
“कॉलेज संपलं की… तू काय करणार आहेस...?”

माधव क्षणभर गप्प राहिला...,  नंतर खोल श्वास घेत म्हणाला...,
“नोकरी लागली आहे… मुंबईबाहेर… पण हे सांगताना आनंदापेक्षा जास्त दुःख वाटतेय…”

गौरवी काही बोलली नाही... फक्त तीने त्याचा हात घट्ट धरला...
कारण तिला समजत होतं... कि प्रेम आता परीक्षेत उतरणार होतं... कारण फक्त भावना नाही, तर संयम, विश्वास आणि वाट पाहण्याची ताकद असणे हिच यांची परीक्षा होती…

"तु यावर काहीच का बोलत नाहीस...? मला तुझं म्हणणं काय आहे ते एकदा ऐकून घ्यायचं आहे... प्लीज काहीतरी बोल..." माधव

"काय बोलू सांग... तुला माझं म्हणणं एकदा ऐकायचं आहे ना... तर मग तु नोकरीसाठी मुंबई बाहेर जाऊ नकोस... असं म्हटलं तर तु ते ऐकणार आहेस का...? किंवा मी म्हटलं तु रोज मला भेटायला कॉलेजला ये... तर तु ते मान्य करणार आहेस का...? सांग जरा..." गौरवी...

यावर माधव काहिच प्रतिक्रिया देत नाही... तो फक्त मान खाली घालून बसलेला असतो...

"बघितलेस तुझ्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरेच नाही आहेत... मग माझ्या मनातले जाणून काय उपयोग..." गौरवी शांतपणे बोलते...

"गौरवी... मी , मला..." माधव बोलत असताना गौरवी त्याला मधेच अडवत बोलते...

"मी तुझी वाट पाहिन..." गौरवी

"गौरवी..." माधव

"नकोस माझी चिंता करू... मी आहे तुझ्यासोबत..." गौरवी

…गौरवीचे ते शब्द ऐकून माधवच्या डोळ्यांत पाणी तरळले...

तो हळूच तिच्याकडे पाहतो…
“तुला कळतंय ना, मी दूर जाणार म्हणजे तुझ्यापासून नाही… तर फक्त स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी…” तो थरथरत्या आवाजात म्हणाला...

गौरवी हलकेच हसली...
“मला माहीत आहे… म्हणूनच तर म्हणतेय, मी वाट पाहीन... प्रेम म्हणजे रोज समोर असणं नाही माधव, तर एकमेकांवर विश्वास ठेवणं आहे...”

तो तिचा हात घट्ट पकडतो...
“मी परत येईन… स्वतःला सिद्ध करून, तुझ्या आयुष्यात कायमचा राहायला...”

कॉलेजचे शेवटचे दिवस संपले…
वेगळे रस्ते, वेगवेगळी शहरं… पण मनात एकच ठिकाण कोरलं गेलं होतं... एकमेकांचं...

वेळ जात राहिली…
कधी फोनवरचे शब्द कमी पडायचे, कधी शांततेतच प्रेम व्यक्त व्हायचं... आणि कुठेतरी… या अंतरातच त्यांचं प्रेम अधिक परिपक्व होत गेलं...

कारण आता ते फक्त भावना नव्हतं, तर एक आश्वासन होतं…
“वाट पाहण्याचं...”



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all